दिल्लीत पोलिसांनीच सुरु केले आंदोलन , शेवटी पोलिसच त्यांना रोखण्यासाठी पुढे आले ....

Foto
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एक अत्यंत अभूतपूर्व आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. एरवी इतरांचे आंदोलन रोखणार्‍या दिल्लीपोलिसांच्या कर्मचार्‍यांनीच सोमवारी थेट दिल्ली पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर स्वतःच्याच प्रशासनाविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आंदोलन करणार्‍या पोलिसांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनालाच इतर पोलीस तैनात करावे लागले आहेत. वकिलांशी झालेल्या वादानंतर आपल्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नेमके काय घडत आहे मुख्यालयाबाहेर?
सोमवारी सकाळपासून पोलीस मुख्यालयाच्या मुख्य गेटबाहेर अनेक पोलीस कर्मचारी एकत्र जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. माहितीनुसार, नवी दिल्ली जिल्ह्याचे काही ऑन-ड्यूटी पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. शर्मा यांनी आंदोलक कर्मचार्‍यांना रस्त्यावरून मुख्यालयाच्या आत येऊन वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन केले असून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कुठून पेटला वाद?
या संपूर्ण वादाची ठिणगी २३ ऑक्टोबर रोजी शाहदरा पोलीस ठाण्यात पडली होती. तेथे पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या झटापटीत ललित बन्सल नावाच्या वकिलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात वकील आणि पोलिसांमध्ये जोरदार हाणामारी झाली. घटनेच्या निषेधार्थ दिल्लीतील जिल्हा न्यायालयांच्या वकिलांनी बेमुदत संप पुकारला होता आणि संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी लावून धरली होती.

दोन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदलीने पोलिसांमध्ये रोष
वकिलांच्या वाढत्या दबावानंतर दिल्ली पोलीस प्रशासनाने २८ ऑक्टोबर रोजी दोन अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढले. गांधी नगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी एसीपी मनस्वी वशिष्ठ यांची बदली स्पेशल पोलीस युनिट फॉर वुमन अँड चिल्ड्रन मध्ये करण्यात आली. तर शाहदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन एसएचओ इन्स्पेक्टर अरुण कुमार यांची बदली थेट सुरक्षा युनिटमध्ये करण्यात आली. या एकतर्फी कारवाईमुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. केवळ दबावाखाली येऊन आपल्याच निष्ठावंत अधिकार्‍यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत कर्मचार्‍यांनी थेट मुख्यालयासमोर आंदोलन पुकारले असून या बदल्या त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.